Breaking News

Goa Rape Case: 'मुली रात्रभर बीचवर कशासाठी?' मुख्यमंत्र्यांच्या प्रश्नाने खळबळ

Goa Rape Case: 'मुली रात्रभर बीचवर कशासाठी?' मुख्यमंत्र्यांच्या प्रश्नाने खळबळ

 पणजी : गोव्यामध्ये रविवारी रात्री बेनॉलिम बीचवर दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. त्यात भर म्हणजे या घटनेसंदर्भात गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी विधानसभेत केलेल्या वक्तव्यावरुन सध्या जोरदार टीका होत आहे. प्रमोद सावंत यांनी विधानसभेत म्हटलंय की, आई-वडिलांनी याबाबत आत्मचिंतन करण्याची गरज आहे की, त्यांची मुलं संपूर्ण रात्रभर बीचवर का होती? त्यांच्या या वक्तव्यावर विरोधकांकडून सध्या जोरदार टीका केली जात आहे. त्यांचं हे वक्तव्य लज्जास्पद असल्याची टीका केली जात आहे.

मुलांची सुरक्षितता पालकांची जबाबदारी

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी विधानसभेतील चर्चेदरम्यान म्हटलं की, जर १४ वर्षांची मुले संपूर्ण रात्रभर समुद्र किनाऱ्यावर राहत असतील, तर त्यांच्या आई-वडिलांना याबाबत आत्मचिंतन करण्याची गरज आहे. आपण फक्त मुले ऐकत नाहीत यासाठी सरकार आणि पोलिसांना जबाबदार ठरवू शकत नाही. आपल्या मुलांची सुरक्षितता ही आई-वडलांची देखील जबाबदारी आहे आणि त्यांनी आपल्या मुलांना खासकरुन अल्पवयीन मुलांना रात्र-रात्रभर बाहेर रहायला देणं योग्य नाही. प्रमोद सावंत यांच्या या वक्तव्यावर सध्या विरोधक आक्रमक झाले आहेत.

काँग्रेसचे गोव्याचे प्रवक्ते अल्टोन डी कोस्टन यांनी गुरुवारी म्हटलंय की, राज्यातील किनारी भागातील कायदा आणि सुव्यवस्था पार बिघडली आहे. रात्री बाहेर फिरताना आपण का घाबरायचं? अपराध्यांना तुरुंगात असायला हवं आणि कायद्याचं पालन करणाऱ्या नागरिकांना बाहेर मुक्तपणे फिरता यायला हवं. दुसरीकडे गोवा फॉरवर्ड पार्टीचे आमदार विजय सरदेसाई यांनी म्हटंलय की, नागरिकांची सुरक्षा पोलिस तसेच राज्य सरकारची जबाबदारी आहे. जर ते आपल्याला संरक्षण देऊ शकत नाहीत तर त्यांना मुख्यमंत्री पदावर राहण्याचा काही एक अधिकार नाहीये.

गेल्या रविवारी गोव्याच्या राजधानीमध्ये जवळपास ३० किमी दूर बेनॉलिम बीचवर चार लोकांनी स्वत: पोलिस कर्मचारी असल्याचं सांगत दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. त्यांनी मुलांना मारहाण देखील केली. चार आरोपींमधील एक सरकारी कर्माचारी आहे. प्रमोद सावंत यांनी दिलेल्या माहितीनुसार, चार आरोपींना अटक केली गेली आहे.


कोई टिप्पणी नहीं